खिल्लार किंवा खिल्लारी गाय हा शुद्ध भारतीय गोवंश असून, प्रामुख्याने महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, सोलापूर व या जिल्ह्यांच्या सीमेलगत असणाऱ्या कर्नाटकातील जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतो.[१]
हा महाराष्ट्रातील लोकप्रिय गोवंशांपैकी एक असून या गोवंशाला महाराष्ट्राची शान असे म्हणतात.[२] या गोवंशात प्रांतानुसार खालील मुख्य उपजाती आहेत – काजळी खिल्लार, कोसा खिल्लार, गाजरी खिल्लार, हरण्या खिल्लार, इत्यादी. या गोवंशाच्या गायी इतर गोवंशापेक्षा कमी दूध देतात अशी समजूत आहे. पण योग्यप्रकारे पैदास केल्यास यांचे दूध कमालीचे वाढते हे सिद्ध झाले आहे. या वंशाची गाय दिवसाला ३ ते ६ लिटर दूध देते. तसेच जर मुक्तगोठा असेल आणि वासरू सोबत असेल तर यांना दिवसातून ५-६ वेळा पान्हा फुटतो. पण इतर गोवंशापेक्षा या खिल्लार गोवंशाचे दूध हे आरोग्यास उत्तम आहे. आज महाराष्ट्रामध्ये दिवसाला १० लिटर दूध देणाऱ्या देखील जातिवंत खिल्लार गाई पाहायला मिळतात.